Sunday, March 29, 2009

शब्दांची ओंजळ

आपल्या कवींच्या या सुंदर कल्पना...
किती तरी दिवसात
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो
खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच
-बा सी मर्ढेकर
............................................
जिना असावा असाच अंधा
कधी न कळावी त्याला असावा चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधी न करावी चहाडखोरी.
मी तर म्हणतो - स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पॄथ्वीवरल्या आठवणींनी वळणावळणावरी हसावे...
कवी - वसंत बापट
.................................................................................
दर्यावरची रंगीत मखमल उचलुन घेते कुणी
कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी
दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता घरी जायला हवे
कवी - कुसुमाग्रज
............................................................................
सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण
व्हावे एव्हढे लहान
सारी मने कळों यावी
असा लागावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी
कवी - म. म. देशपांडे
...........................................................................
धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले एक तन.. एक मन..
माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली
...........................................
मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.
विसरुनी गेलो पतंग नभिचा;
विसरून गेलो मित्राला;
पाहुन तुजला हरवुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.
...............................................
...................................................
अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा
जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा

कवी- इलाही जमादार
....................................................................

No comments: