Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

Friday, November 21, 2008

मिळुनी सार्‍याजणी मासिकातील एक कथा

कहाणी - एका ह्रदय कुटुंबाची



परिवर्तनात छोट्या छोट्या व्यक्तिगत योगदानाचं खूप मोल असतं.सामान्य माणसातील असामन्यत्त्वाचा हा दिलासा-मानवी मन हे अनेक कप्प्यांचे बनलेले असते. म्हणूनच कोणत्या समस्येच्या वेळी त्याच्या मनाची प्रतिक्रिया कशी होईल याचा अंदाज करणे कठीण असते. पूर्वीच्या काळी सावत्र नात्याची काळी बाजूच लोकांपुढे यावयाची आणि ती पुष्कळदा खरीही असायची. त्यातील प्रमुख कारण म्हणजे खऱ्या शिक्षणाचा अभाव. खरे शिक्षण जे मन विशाल करते व विचारांना चालना देते. माझ्या एका परममित्राच्या कुटुंबाची ही कथा आहे. ह्या कुटुंबाने एका परप्रांतीय सुनेचा तिच्या लहान मुलीसकट स्वीकार केला व तिला व तिच्या मुलीला आपले मानले. माझ्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर त्यांच्या ह्या कृतीमुळे अनेक पटींने वाढला.मी व माझे हे मित्र, केंद्रसरकारच्या एकाच खात्यात नोकरीला होतो. दोघांचीही घरची परिस्थिती अगदी बेतासबात. मित्राच्या वडिलांना लोक `शास्त्रीजी' म्हणूनच संबोधायचे. माझे हे सहकारी तीन भावंडातील एक होते. त्यांना स्वत:ला एक मोठी मुलगी व एक धाकटा मुलगा. मुलीचे शिक्षण आटोपल्यावर तिला चांगली नोकरी लागली व यथावकाश तिचे लग्नही झाले. मुलगाही चांगला सी.ए./एम.बी.ए. पर्यंत शिकला पण त्याचे मन नोकरीत कधीच रमले नाही, त्याला स्वतंत्रपणे काही करायचे होते. त्या दिशेने त्याची सतत धडपड चालू होती. सुदैवाने त्याला एक भागीदार मिळाला व त्याच्याबरोबर साथीदारीत त्याने वाणिज्य विषयाचे खाजगी शिकवणीवर्ग चालू केले. त्यातील चड-उतार पार करून हळूहळू चांगला जम बसवला. व्याप खूपच वाढला व थोड्याच वर्षांत हे वर्ग नावारूपाला आले. मित्रानेही मुलाला आपल्या भविष्य-निर्वाह निधीतून पैसे काढून वेळोवेळी मदत केली.थोडी स्थिरता आल्यावर मुलाचे लग्न झाले. सूनही मुलाच्याच म्हणजे वाणिज्य शाखेचीच पदवीधर होती. पण थोड्याच कालावधीत मुलांत व सुनेत काही कारणामुळे विसंवाद उत्पन्न झाला. मित्राने व त्याच्या सोशिक पत्नीने दोघांत सलोखा करण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याचा काहीच उपयोग न होता प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले. पण अशाच प्रसंगी माणसाच्या धैर्याची खरी परीक्षा होते व त्यातून मार्ग काढण्याचे आंतरीक बळ देते. मित्र त्यातून सावरला. यथावकाश तो नोकरीतून निवृत्त झाला. आणि अचानक एक दिवस आम्हाला बातमी कळली की मुलाचे पुन्हा लग्न झाले आहे. फक्त लग्न झाल्याचेच सुरुवातीला कळले. नंतर कळले की आधीच्या लग्न संबंधातून नवीन सुनेला एक लहान मुलगीपण आहे व ही सूनही प्ररप्रांतीय आहे. थोडे आश्चर्यच वाटले. १/१ ।। वर्षाच्या कालावधीत मला जाणवले की नवीन सून आणि नात, ही मित्राच्या घरात पूर्णपणे रुळली आहेत व त्यांच्या घरचीच झाली आहेत. हे चित्र पाहिल्यावर आम्हांला आमच्या मित्राचे व विशेष करून वहिनीचे खूप कौतुक वाटले. नात १ ।। वर्षाची असतानाच त्यांना नातू झाला. आता नात आणि नातू यांचा संभाळ, आजी-आजोबा, कोणताही भेदभाव न करता आनंदाने करीत आहेत. मुलगा व सून आपले क्लास व इतर उद्योग समर्थपणे सांभाळत आहेत.मला ह्या मित्राचे व वहिनींचे अपार कौतुक वाटते. त्यांनी मुलाला घटस्फोटाच्या धक्क्यातून सावरताना मानसिक आधार तर दिलाच, पण मुलाच्या सुखाचा विचार करून त्याने पसंत केलेल्या परप्रांतीय सुनेचा, तिच्या लहान मुलीसह आनंदाने स्वीकार केला. मनाचा मोठेपणा असल्याशिवाय असा स्वीकार करणे शक्यच झाले नसते. असा स्वीकार करताना त्यांच्याही मनात अनेक विचारांची, शंका-कुशंकांची आवर्तने नक्कीच उठली असतील. पण मुलाचे सुख तेच आपलेही सुख हाच विचार शेवटी प्रबळ ठरला असणार. जेव्हा-जेव्हा नात आणि नातवाला मित्राबरोबर बघितले तेव्हा-तेव्हा ते दोघांवर समान माया करतांना दिसले. नात परक्याची अशी भावना त्यांच्या वागण्यात आम्हांला कधीही आढळली नाही. मित्राच्या सद्गुणाचा हा पैलू माझ्या मनावर कायमचा ठसा उमटवून गेला. आजच्या स्वयंकेद्रित कुटुंबव्यवस्थेत या कुटुंबाची चांगुलपणाची ही हकिकत वाचून आणखी काही जणांच्या हृदयातही माझ्यासारखीच ज्योत लुकलुकली तर ही हकिकत लिहिण्याचे सार्थक झाले असे मला वाटेल.

Monday, October 13, 2008

भाव - (रणजित देसाई याच्या 'आलेख' पुस्तकातील कथा)

भाव
डोंगरउतरणीवर ते पाच-पंचवीस झोपड्यांचं बेरड वस्तीचं गाव होतं।भल्या पहाटे लगमा उठली होती.तिचं सार अंग दुखत होतं.काल सारा दिवस तिने रानात काढला होता.पूर्वी तास दोन तास रानात फिरलं तर टोपलीभर चिन्न गावायची.काल सबंध दिवस फिरुन पोरांच्या तोंडात टाकायला पुरेशी चिन्न मिळाली नव्हती.कालपर्यंत कसेबसे दिवस ढकलले;पण आज काय? त्या विचाराबरोबर लगमाचा आळस कुठच्या कुठे गेला.गावातनं कोंबडे आरवत होते.झोपलेल्या आपल्या मुलांवरुन लगमाने नजर फिरवली आणि तिने चूल पेटविली.लगमानं भांड घेतलं आणि पाणी गरम करुन ती झोपडीमागे उभ्या केलेल्या खोपटात गेली.तिला पाहतच गाईनं हंबर केला.लगमाने शेणकाडी आवरली आणि धार काढून ती झोपडीत आली.पोरं अजुन झोपली होती.दूध चार वाट्या पाणी तरी भरेल की नाही,याची शंका होती.लगमानं त्यात दोन वाट्या पाणी मिसळलं आणि दूध तापत ठेवलं. लगमाचा नवरा कल्लू धान्य आणण्यासाठी दोन दिवसांमागेच घराबाहेर पडला होता.संध्याकाळी येतो म्हणून पैसे घेऊन गेलेला तिचा नवरा दोन दिवस झाले तरी परतला नव्हता.लगमा वाट पाहून थकली होती.गेले दोन दिवस होते ते मूठभर तांदूळ तिनं सकाळी पेज आणि रात्री भात म्हणून पुरविले होते...गावात सगळी घर ती फिरून आली होती.जे लगमाचं होतं तेचं गावाचं.खायला नव्हतं तर उसनं देणार कोण? लगमा चुलीत काडया सरकवीत विचार करीत होती.अचानक लगमानं तोंड फिरवलं.पाठीवर धाकटा यल्ला ओणवा झाला होता.थोरला सत्या अजून झोपलाच होता.यल्ला म्हणाला,'आये..भूक!खाया दे!' 'उटलं न्हाई तवर भूक! खा मला आनी मर!'लगमा बोलून गेली.दुसर्‍याच क्षणी दिवसांमागं शेजारच्या झोपडीत गमावलेलं पोर आठवलं.लगमा कळवळली.भ्यालेल्या यल्लाला तिनं जवळ घेतलं.यल्ला हसला.रडणार्‍या आईकडे तो पोहू लागला.पाठोपाठ थोरला सत्या उठला.तो चुपचाप आईजवळ येऊन बसला.लगमानं दुधाचं भांडं उतरलं.लगमा म्हणाली,'सत्या दूध पी आनी गाय घेऊन जा.''दुद!' सत्या म्हणाला,'आये आज कन्या न्हाईत?''ठेवल्यात तुज्या बानं!कुठं उलथलाय कुनास दखल!'सत्या काही बोलला नाही.खोल गेलेल्या डोळ्यानं त्यानं आपल्या आईकडे बघितलं आणि गप बसून राहिला.लगमानं दोन्ही पोरांना दूध दिलं.पोर बाहेर जाऊन आली. सत्या गाय सोडून घेऊन निघाला.त्याचा जीव घुटमळला.जाता जाता धीर करुन तो म्हणाला,'आये..आल्यावर खायला देशील?'सत्याकडे न बघता लगमा म्हणाली,'जा बघू! आल्यावर दीन खायला. शानं माझा सत्या!'सत्या गेला.यल्ला खेळायला गेला;पण आणखी थोडया वेळात ही पोरं कळवळून घरला येणार हे लगमाला माहीत होतं.रानात चिन्नं-पिरशी गोळा करायला जावं असा विचार तिच्या मनात आला.पण आजवर आलेल्या अनुभवानं तिनं तो विचार मागे टाकला.लगमा विचार करत होती.गाठीला पैसं असून खायला का मिळत नाही हे तिला कळत नव्हतं. रंगीकडे मागितलं तर पसाभर का होईना,नाचणं मिळायची शक्यता होती.पण तिच्याकडे जायची लाज वाटत होती.रंगी सार्‍या गावाला पुरुन उरलेली बाई.आजवर लई जोर तिचा.तिथं दारू खायची आणि घरात जाऊन बाईल बोलली की मारहाण करायची.अध्र्या रात्रीपर्यंत आरोड,हे नेहमीच झालं होत.दोन दिवसामागं लगमानं असचं कल्लूला छेडलं.कल्लूनं समोर दहा रुपयांची नोट टाकली आणि म्हणाला,'हे घे पैसं'चार पोरांस्नी!तालेवर तू!पैसं खात्यात?'कल्लू तसाच रागानं बाहेर गेला.सरळ रंगीच्या झोपडीत शिरलेला बघताच लगमाचं डोकं फिरलं.सरळ जाऊन तिनं रंगीच्या झिंज्या धरल्या.एकच गलका उसळला.रडारड झाली,आणि बर्‍याच वेळानं गावं शांत झालं.त्याच रंगीच्या दारात गेलं तर काय म्हणेल ती!लगमा उठली.सरळ ती रंगीच्या झोपडीकडे गेली.लगमाला पाहून रंगीचा विश्वास बसेना.लगमा म्हणाली,'आक्का!''काय?'पोरास्नी खाया कायबी न्हाई.उसनं आजच्यापुरत भात देशील?आज आलं की सवाईनं परत करीन.''झिंज्या उपटाय आली व्हतीस तवा लाज वाटली न्हाई?दारु खाणार तुझा घो आनी गाली खानार मी व्हय?लगमा तिथं थांबली नाही.रंगीनं टाकलेली पिंक न पाहताही लगमाला दिसली. मोकळ्या झोपडीत जाऊन ती गप्प बसून राहीली.भूकेनं आतडी तुटत होती.काय करावं सुचत नव्हतं.राहून राहून उरलेल्या दुधाकडं तिचं लक्ष जात व्हतं.तोच धाकटा रडतं आत आला.काही न बोलता लगमानं त्याला वाटीभर दूध दिलं.निश्चयानं ती उठली.घराची आवराआवर केली.धाकट्याला हाताशी धरुन ती शेजारी गेली.'मल्लवा!'मल्लवा दाराशी आली 'काय गं?''जरा पोरावर नजर ठेव.म्या वाडीवर जाऊन येतो.''कल्लू आला न्हाई?''न्हाई.''वाडीवर धान मिळतंया म्हनं.''कुनाकडं?''वान्याला सरकारनं दिलंय म्हनं वाटायला.''बघतू.''आये..मी येतो संगं.''जीव घीन!गुमान र्‍हा.खायला आनतो तुला.'लगमानं दटावलं.लगमानं उतरंडीत लपवून ठेवलेली नोट चोळीच्या दंडात खोवली आणि ती वाडीकडे चालू लागली.सारा शिवार श्रावणाच्या उनात चकाकत होता.महिनाभरात शिवारात हळवी भातं येणार होती.नाचणा काळाभोर दिसत होता...डेरेदार आंब्याच्या राईत वसलेली वाडी दिसू लागली.लगमाच्या गावाला बाजारचं तेच ठिकाण होतं.पिठाच्या गिरणीचा आवाज कानांवर येत होता.लगमा वाडीत गेली तेव्हा भरदुपार झाली होती.वाडी फार तर हजार दीड हजार वस्त्तीचं गावं.सोमवारी बाजार.त्या दिवशी पंचक्रोशीतल्या छोट्या खेडयांची माणसं तिथं बाजाराला गोळा व्हायची.एरव्ही गाव कसं शांत असायचं.लगमा वाडीतून चालत होती। दोन प्रहरी दुकानाची एक फळी उघडी ठेऊन दुकाने उघडी होती।रस्त्यावर कुत्रंदेखील दिसत नव्हतं.लगमा वाण्याच्या दुकानावर गेली. दुकानात वाण्याचा थोरला पोरगा आप्पा होता।दुकानाच्या दोन फळ्या उघड्या होत्या.आप्पाने बसल्या जागेवरुन लजमावर नजर फेकली.लजमा दोन पोरांची आई होऊनही उफाडयाची दिसत होती.सावळा रंग असुनही तिची भरदारा अंगलट लपत नव्हती.आप्पानं विचारलं,'काय पायजे?''सावकार!दाणं मिळत्यात म्हणून समजलं'आप्पा हसला.आपली नजर लगमावर रोखत म्हणाला,'मिळतंय की.पण कारड काढलंस?'कसलं?''मग झालं?तुला कसं मिळनार?सरकारी बाब ही!''असं म्हनू नकासा धनी!अडचणीला कवाबी काम सांगा.करीन मी.''खरं!'आप्पानं विचारलं.'खोटं सांगत न्हाई मी.लगमा आशेनं म्हणाली.'तू माझ्या नडीला पावलीस तर देतो की दाणं!चांगलं भात आहे.''कसली नड?''आता फळया लावून घेतो.उगीच कोन याय नको.मागच्या दारानं ये.'आप्पा निर्लज्जपणे म्हणाला. लगमाचा संताप उफाळला.आप्पानं एक फळी लावली होती.लगमा उफाळली,'तुझी आई..''चूप!'आप्पा खेकसला,ज्यादा बोलायचं काम न्हाई.पटत नसलं तर निघून जा.पटलं;मागच्या दारानं ये.'दुकनाची उरली फळीही बंद झाली.रस्ता उन्हात तापत होता;पण हवेतला गारवा संपत नव्हता.लगता बंद फळीकडे बघत होती.डोळयांत पाणी उभं होतं...
गिरणीत सडून घेतलेले तांदूळ घेऊन लगमा संध्याकाळी गावची वाट चालत होती.गावात झोपडीसमोर थोरला बसला होता.आईला पाहून तो आनंदला.आईच्या डोक्यावरचं गठळं निरखीत तो म्हणाला,'भात मिळालं?''व्हय लेका!पन धाकला कुठं हाय?''आत झोपलाय.लई रडला.भूक लागलीया बघ.'लगमा आत गेली.गडबडीने तिनं चूल पेटवली.तांदूळ धुतले आणि तिने ते चुलीवर चढविले.भात शिजत होता.धाकटा उठला.तो आईला बिलगला.रात्री दूध-भात पोटभर खाऊन पोरं झोपली.दोन्ही पोरांच्यामध्ये लगमा सताड उघडया डोळयांनी जागी होती.राहून राहून डोळयातून अश्रू येत होते. दुसर्‍या दिवशी नेहमीप्रमाणे लगमा उठली.तिने पेज तयार केली.धार काढली.पोरांना पेज देऊन पिटाळलं.थोडे तांदूळ काढून तिने जाते मांडले.भाकरीसाठी ती तांदळाचं पीठ दळू लागली.जात्याची घरघर चालू असता झोपडीत कल्लू आला.लगमाचं जातं थांबलं.कल्लूच्या पाठीला ओझं होतं.कल्लू म्हणाला,'घे!नाचणं हाईत.भात हाय.सुगीपातूर काळजी न्हाई.''काल का आला न्हाईसा?''काल?अगं,मिळाय नको?दहा कोसांवर मामाचं गाव.दिवस रात तेच्या संगं वाक बडवला तवा पैसं देऊन हे मिळालं.काय दळत न्हतीस?''तांदूळ!''कुठं मिळालं?''वाडीला.''काय भाव!''भाव?'लगमानं दचकून नवर्‍याकडे पाहिलं.तिचे डोळे भरले.हसून ती म्हणाली,'लई पैसं घेतलं.''मिळालं हेच थोर.'कल्लू म्हणाला.'आग लागली त्या तांदळाला.'म्हणत लगमा उठली.तिने काल आणलेल्या तांदळाचं गठलं उचललं आणि संतापानं ती झोपडीबाहेर गेली.दारात उभी राहून ती ओरडली,'गी...गी...गी..'सार्‍या झोपडयांच्या कोंबडया कलकलत समोरच्या आल्या.लगमाने गठळयातले तांदूळ फेकायला सुरुवात केली.कोंबडया तांदळावर तुटून पडत होत्या.दाराशी आलेला कल्लू थक्क झाला.तो भानावर येऊन थांबला.लगमाच्या हातून गटलं हिसकावून घ्यायचा तो प्रयत्न करीत होता.लगमा त्याच्याशी झोंबत होती.चावत होती.कल्लूनं उरलं गठलं हिसकावून घेतलं.लगमाला लाथ मारली.लगमा पडली.कोंबडया भिऊन कलकलल्या.
धरणीवर पडलेली लगमा मुक्त कंठानं रडत होती....

मायमराठी