Showing posts with label सुरेश भट. Show all posts
Showing posts with label सुरेश भट. Show all posts

Thursday, October 16, 2008

o सुरेश भटांची कविता

जगत मी आलो असा
जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!
जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!
कैकदा कैफात मझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!
सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!
स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!
वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!
संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!
(रंग माझा वेगळा ह्या काव्यसंग्रहातून)

o सुरेश भटांची कविता

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!
मी फिरेन दूर दूर
तुझिया स्वप्नांत चूर;
तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल!
विसरशील सर्व सर्व
अपुले रोमांचपर्वपण
माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल!
सहज कधी तू घरात लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल!
जेव्हा तू नाहशील,
दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!
जेव्हा रात्री कुशीतमाझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल!
मग सुटेल मंद मंदवासंतिक पवन धुद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल