Friday, November 21, 2008

मिळुनी सार्‍याजणी मासिकातील एक कथा

कहाणी - एका ह्रदय कुटुंबाची



परिवर्तनात छोट्या छोट्या व्यक्तिगत योगदानाचं खूप मोल असतं.सामान्य माणसातील असामन्यत्त्वाचा हा दिलासा-मानवी मन हे अनेक कप्प्यांचे बनलेले असते. म्हणूनच कोणत्या समस्येच्या वेळी त्याच्या मनाची प्रतिक्रिया कशी होईल याचा अंदाज करणे कठीण असते. पूर्वीच्या काळी सावत्र नात्याची काळी बाजूच लोकांपुढे यावयाची आणि ती पुष्कळदा खरीही असायची. त्यातील प्रमुख कारण म्हणजे खऱ्या शिक्षणाचा अभाव. खरे शिक्षण जे मन विशाल करते व विचारांना चालना देते. माझ्या एका परममित्राच्या कुटुंबाची ही कथा आहे. ह्या कुटुंबाने एका परप्रांतीय सुनेचा तिच्या लहान मुलीसकट स्वीकार केला व तिला व तिच्या मुलीला आपले मानले. माझ्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर त्यांच्या ह्या कृतीमुळे अनेक पटींने वाढला.मी व माझे हे मित्र, केंद्रसरकारच्या एकाच खात्यात नोकरीला होतो. दोघांचीही घरची परिस्थिती अगदी बेतासबात. मित्राच्या वडिलांना लोक `शास्त्रीजी' म्हणूनच संबोधायचे. माझे हे सहकारी तीन भावंडातील एक होते. त्यांना स्वत:ला एक मोठी मुलगी व एक धाकटा मुलगा. मुलीचे शिक्षण आटोपल्यावर तिला चांगली नोकरी लागली व यथावकाश तिचे लग्नही झाले. मुलगाही चांगला सी.ए./एम.बी.ए. पर्यंत शिकला पण त्याचे मन नोकरीत कधीच रमले नाही, त्याला स्वतंत्रपणे काही करायचे होते. त्या दिशेने त्याची सतत धडपड चालू होती. सुदैवाने त्याला एक भागीदार मिळाला व त्याच्याबरोबर साथीदारीत त्याने वाणिज्य विषयाचे खाजगी शिकवणीवर्ग चालू केले. त्यातील चड-उतार पार करून हळूहळू चांगला जम बसवला. व्याप खूपच वाढला व थोड्याच वर्षांत हे वर्ग नावारूपाला आले. मित्रानेही मुलाला आपल्या भविष्य-निर्वाह निधीतून पैसे काढून वेळोवेळी मदत केली.थोडी स्थिरता आल्यावर मुलाचे लग्न झाले. सूनही मुलाच्याच म्हणजे वाणिज्य शाखेचीच पदवीधर होती. पण थोड्याच कालावधीत मुलांत व सुनेत काही कारणामुळे विसंवाद उत्पन्न झाला. मित्राने व त्याच्या सोशिक पत्नीने दोघांत सलोखा करण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याचा काहीच उपयोग न होता प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले. पण अशाच प्रसंगी माणसाच्या धैर्याची खरी परीक्षा होते व त्यातून मार्ग काढण्याचे आंतरीक बळ देते. मित्र त्यातून सावरला. यथावकाश तो नोकरीतून निवृत्त झाला. आणि अचानक एक दिवस आम्हाला बातमी कळली की मुलाचे पुन्हा लग्न झाले आहे. फक्त लग्न झाल्याचेच सुरुवातीला कळले. नंतर कळले की आधीच्या लग्न संबंधातून नवीन सुनेला एक लहान मुलगीपण आहे व ही सूनही प्ररप्रांतीय आहे. थोडे आश्चर्यच वाटले. १/१ ।। वर्षाच्या कालावधीत मला जाणवले की नवीन सून आणि नात, ही मित्राच्या घरात पूर्णपणे रुळली आहेत व त्यांच्या घरचीच झाली आहेत. हे चित्र पाहिल्यावर आम्हांला आमच्या मित्राचे व विशेष करून वहिनीचे खूप कौतुक वाटले. नात १ ।। वर्षाची असतानाच त्यांना नातू झाला. आता नात आणि नातू यांचा संभाळ, आजी-आजोबा, कोणताही भेदभाव न करता आनंदाने करीत आहेत. मुलगा व सून आपले क्लास व इतर उद्योग समर्थपणे सांभाळत आहेत.मला ह्या मित्राचे व वहिनींचे अपार कौतुक वाटते. त्यांनी मुलाला घटस्फोटाच्या धक्क्यातून सावरताना मानसिक आधार तर दिलाच, पण मुलाच्या सुखाचा विचार करून त्याने पसंत केलेल्या परप्रांतीय सुनेचा, तिच्या लहान मुलीसह आनंदाने स्वीकार केला. मनाचा मोठेपणा असल्याशिवाय असा स्वीकार करणे शक्यच झाले नसते. असा स्वीकार करताना त्यांच्याही मनात अनेक विचारांची, शंका-कुशंकांची आवर्तने नक्कीच उठली असतील. पण मुलाचे सुख तेच आपलेही सुख हाच विचार शेवटी प्रबळ ठरला असणार. जेव्हा-जेव्हा नात आणि नातवाला मित्राबरोबर बघितले तेव्हा-तेव्हा ते दोघांवर समान माया करतांना दिसले. नात परक्याची अशी भावना त्यांच्या वागण्यात आम्हांला कधीही आढळली नाही. मित्राच्या सद्गुणाचा हा पैलू माझ्या मनावर कायमचा ठसा उमटवून गेला. आजच्या स्वयंकेद्रित कुटुंबव्यवस्थेत या कुटुंबाची चांगुलपणाची ही हकिकत वाचून आणखी काही जणांच्या हृदयातही माझ्यासारखीच ज्योत लुकलुकली तर ही हकिकत लिहिण्याचे सार्थक झाले असे मला वाटेल.

No comments: